Monday, April 21, 2014

नक्षत्रचित्रे


खरे सांगायचे झाले तर, या ब्लॉग series ची सुरुवात कशी करावी हा एक प्रश्न होता. योगायोगाने म्हणा, मी शांताबाई शेळकेंच 'नक्षत्रचित्रे' हे पुस्तक दोन दिवसांपूर्वी वाचायला घेतलं आणि मग विचार आला, यांनीच का सुरु करू नये? या पुस्तकाबद्दल लिहिण्याची २ करणं - १. पुस्तकाचं नाव आणि २. पुस्तकाचा आशय. हे एक छोटेखानी पुस्तक आहे आणि माझ्या मराठी साहित्याच्या 'अफाट' ज्ञानामुळे खरोखर या पुस्तकाच्या प्रसिद्धीबाबत मला माहिती नाही.
पुस्तक उचललं ते नावामुळे आणि अर्थात शांताबाई लेखिका म्हणून. प्रारंभिक डॉ. अरुणा ढेरे यांनी लिहिलंय आणि तंतोतंत त्या म्हणतात तसं, नक्षत्रचित्रे हे किती सुंदर नाव ! शान्ताबाईंची हि खासियत असावी - लेखन विषयाला अनुसंगून अतिशय शोभणारं नाव निवडणं. चपखल. समृद्ध शब्दसंपदा असणं एक पण एवढ्या मोठ्या आशयाचा सारांश सहज एखाद्या शब्दात पकडणं काही निराळंच ! आजून एक असंच नाव जे एकदम पटलं, ते म्हणजे 'मृद्गंध'. इंदिराबाई संतांच ते पुस्तक. स्वतःच्या आयुष्यावर लिहिलेलं.
नक्षत्रचित्रे मध्ये शान्ताबाईंना  भेटलेल्या आठ नक्षत्रांवर त्यांनी लिहिलेल्या लेखांच संकलन आहे. हे लोक म्हणजे, भालजी पेंढारकर, सुधीर फडके, कुसुमाग्रज, इंदिरा संत, भा. रा. भागवत, रणजीत देसाई, व. पु. काळे आणि विजया राजाध्यक्ष. यातल्या बऱ्याच जणांची पहिली ओळख पाठ्यपुस्तकातील ! नंतर थोडाफार वाचन झालेलं. ही नावे पाहिल्यावर माझ्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली की या दिग्गज लोकांबाबत बाईंसारख्या लेखिकेनी काय आणि कसं लिहिलं असेल. पहिली भावलेली गोष्ट म्हणजे, सगळं मनमोकळ लिहिलंय. ज्या नात्यांमध्ये थोडा औपचारीक भाव, आदरयुक्त भीती होती ते तसच लिहिलंय आणि ज्या लोकांबरोबर मैत्री होती ते तस. कुठला आव आणलेला नाही. या सर्व लोकांच्या स्वभावाचे पैलू समोर येताना, शान्ताबाई पण समजत जातात. स्वतःच्या गुणदोषाबद्दल मोकळेपणाने लिहितात. हे लेख वेगवेगळ्या कारणांनी, वेगवेगळ्या वेळी लिहिलेले आणि वेगवेगळ्या मासिकांत छापून आलेले. त्यामुळे असेल, पण प्रत्येक लेखाच्या तपशीलात फरक अहे. शान्ताबाई हयात असेपर्यंत हे लेख संकलित होऊन पुस्तक रुपात येऊ शकले नाहीत. कदाचित त्या असताना हे झालं असतं, तर अजुन सुरस झालं असतं. तसं असलं तरी हे पुस्तक नक्कीच वाचनीय आहे. नाहीतर माझ्यासारख्यांना या नक्षत्रांच असं चित्रण कधी दिसणार आणि कोण दाखवणार? वरच्या चित्रातल्यासारख? :)



image source - http://fernhillresorts.com/

No comments:

Post a Comment